दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
दारू पिण्यास पन्नास रुपये दिले नाही म्हणून डोक्यात घातल्या विटा; जखमी अत्यवस्थ
संगमनेर : दारू पिण्यास पन्नास रुपये दिले नाही, म्हणून अल्पवयीन तरुणाने एका व्यक्तीच्या डोक्यावर विटांचे प्रहार करत त्याला गंभीर जखमी केले. जखमीवर संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.
अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. या घटनेला कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते, मात्र त्याच दारूच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाल्याने घडलेला नेमका प्रकार समोर आला.
जखमी झालेले संगमनेरमधील आहेत. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, काल, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास परदेशपुरा येथील देशी दारूच्या दुकानासमोर ही घटना घडली. तेथे एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहोचले. संबंधित व्यक्ती कशाने जखमी झाली याची चौकशी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र प्रत्यक्षदर्शी कोणीही साक्षीदार आढळून आला नाही. पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले आणि आरोपीचा शोध सुरू केला. ज्या दारूच्या दुकानासमोर ही घटना घडली, त्या दारूच्या दुकानातील सीसीटीव्हीमधील चित्रण पोलिसांनी तपासले असता घडलेला नेमका प्रकार समोर आला.