श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांचे संगमनेरात उस्फुर्त स्वागत     |      अज्ञात इसमाने दोन चारचाकी वाहने पेटविली     |      पावसाने शेतकरी हवालदिल; संगमनेर तालुक्यात २२ घरांची पडझड, पत्रे उडाले, तारा तुटल्या     |     
संगमनेरचे गांजा तस्कर सिन्नरमध्ये जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त By Admin 2025-05-19

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेरचे गांजा तस्कर सिन्नरमध्ये जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

संगमनेर/सिन्नर -

संगमनेरमधील दोन गांजा तस्करांना सिन्नर पोलिसांनी मोठ्या कारवाईत अटक केली आहे.हे आरोपी अवैधरित्या गांजाची वाहतूक करत असताना सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ किलो २० ग्रॅम गांजा आणि वाहतुकीसाठी वापरलेली होंडा सिव्हिक कार असा एकूण ८ लाख ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे संगमनेर आणि आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, १६ मे रोजी नाशिक-पुणे महामार्गावरील हॉटेल न्यू वैष्णवीसमोर पोलिसांनी सापळा रचला होता. या सापळ्यात सिल्व्हर रंगाची होंडा सिव्हिक कार (क्रमांक एम. एच. ०१/ई.सी. ५७४८) अडवण्यात आली. गाडीची तपासणी केली असता, त्यात ४ किलो २० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ गाडीतील प्रथमेश पोपट राऊत (वय २५, रा. घुलेवाडी, संगमनेर) आणि शिवाजी गोरख सातपुते (वय २७, रा. साईनगर, नेहरू चौक, संगमनेर) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची किंमत ८२ हजार रुपये असून, होंडा सिव्हिक कारची किंमत सुमारे साडेसात लाख रुपये आहे. आरोपी हे अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि तेगबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक हर्षल भोळे, दत्ता कांभीरे, नवनाथ सानप, संदीप नागपुरे, मेघराज जाधव, समाधान बोराडे, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, इम्रान पटेल, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, सुभाष चोपडा, शरद मोगल, तानाजी झुरडे, योगिता काकड आणि अस्मिता मढवई यांचा समावेश होता.संगमनेरमधील आरोपी सिन्नरमध्ये गांजासह पकडले गेल्याने, आता पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन अधिक तपास करण्याची शक्यता आहे. या तस्करांचे आणखी साथीदार आहेत का आणि ते कोणाला गांजा पुरवठा करत होते, याचा शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. या घटनेमुळे संगमनेरमधील अवैध धंद्यांचे कनेक्शन संगमनेरबाहेर देखील असल्याचे स्पष्ट झाले आहे. संगमनेरमधून राज्याच्या अनेक भागात अशा प्रकारे गांजा विकला जात असल्याची चर्चा सातत्याने होत असते, अनेकदा बाहेरील पोलीस कारवाई देखील करत असतात. मात्र संगमनेर पोलीस अथवा अहिल्यानगरच्या एलसीबीने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केल्याचे दिसत नाही.