संगमनेर : अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर येथील धीरज राजपूत यांच्या कब्रस्तान परिसरात झालेल्या हत्येच्या निषेधार्थ संगमनेर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत असून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आह
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुकुंदनगर येथील धीरज राजपूत या हिंदू युवकाची कब्रस्तान परिसरात झालेली हत्या ही अत्यंत गंभीर, संतापजनक व मन हेलावून टाकणारी घटना आहे. या घटनेमुळे मुकुंदनगर तसेच शिवडी गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
धीरज राजपूत हे हिंदू युवक असून, प्राथमिक माहितीनुसार त्यांनी कपाळावर भगवा टिळा लावलेला असल्याच्या कारणावरून त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. केवळ धार्मिक ओळख दर्शविणारा भगवा टिळा लावल्यामुळे एखाद्या युवकाची हत्या होणे ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. या घटनेमागील नेमके कारण, आरोपींचा हेतू व संपूर्ण पार्श्वभूमी याबाबत सखोल व निष्पक्ष तपास करण्यात यावा.
सदर हत्येचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करीत असून, या प्रकरणातील सर्व आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करण्यात यावी. तसेच प्रकरणाचा निष्पक्ष व जलद तपास करून आरोर्पीविरुद्ध कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.
धीरज राजपूत यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात दोष सिद्ध झाल्यास आरोपींना कायद्यानुसार मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा मिळावी, यासाठी सक्षमपणे खटला चालविण्यात यावा.
निवेदनात धीरज राजपूत यांच्या हत्येतील सर्व आरोपींना तातडीने अटक करावी.
हत्येमागील नेमके कारण व आरोपींचा हेतु याबाबत सखोल व निष्पक्ष तपास करावा.
प्रकरणाचा जलद तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करावी.
दोष सिद्ध झाल्यास आरोपींना मृत्युदंडाची (फाशीची) शिक्षा मिळावी यासाठी सक्षमपणे न्यायालयीन प्रक्रिया राबवावी.
मृताच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सुरक्षा व शासकीय मदत द्यावी.
मुकुंदनगर व शिवडी परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस गस्त व सुरक्षा व्यवस्था वाढवावी. या मागण्या करण्यात आल्या आहेत
शेवटी, या प्रकरणातील आरोपींवर तातडीने व कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही, तर बजरंग दलाच्या वतीने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच या घटनेचा सर्वस्तरीय निषेध नोंदवून, न्याय मिळेपर्यंत लोकशाही व कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, याची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी.
या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी तसेच धीरज राजपूत यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने कुलदीप ठाकूर मित इंगळे, ओंकार भालेराव अनिकेत पवार ,ओम बिलाडे, महेश बागडे सागर पाटील, गणेश बेलेकर, अभय सूर्यवंशी, साईराज चिंतामणी, कृष्णा गंभीर इतरांनी केली आहे

