दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
इंदिरा नगरमधील ७७२ नागरिकांच्या आरक्षणाचा प्रश्न मिटला
संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेरच्या इंदिरा नगरमधील रहिवाशांच्या घरांच्या नोंदीचा अनेक वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत प्रशासनाला धारेवर धरताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संगमनेरचे उपनिबंधक (सब-रजिस्ट्रार) जाधव यांच्यावर तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. तांबेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे इंदिरा नगरमधील सुमारे ७७२ नागरिकांच्या 'पोकळी हिस्से' नोंदीचा मार्ग मोकळा झाला असून, प्रशासन आता तीन दिवसांच्या अल्टिमेटमवर कामाला लागले आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर येथील सर्व्हे नंबर १०६ मधील ६० ते ६५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालमत्ता नोंदीचा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून अत्यंत पोटतिडकीने मांडला. उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी जाधव हे सर्वसामान्यांशी अरेरावीने वागत असून कायदेशीर नोंदी करण्यास राजकीय हेतूने किंवा जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. अधिकाऱ्यांच्या या मुजोर वर्तनावर तांबे यांनी सभागृहात संताप व्यक्त केला.
आमदारांच्या या आक्रमक भूमिकेची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी सभागृहातच उपनिबंधक जाधव यांच्या बदलीची घोषणा केली. इतकेच नव्हे तर, "नोंदणी महानिरीक्षक (IGR) स्वतः तीन दिवसांत संगमनेरला जातील आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करतील. जाधव यांनी दस्त लावण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली असल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल," असे कडक आदेश मंत्र्यांनी दिले आहेत.
इंदिरा नगरमधील जवळपास ७०० नागरिकांचे दस्त नोंदणीसाठी प्रलंबित आहेत. हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी महसूल मंत्र्यांनी विशेष कॅम्प लावण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील तीन दिवस अतिरिक्त मनुष्यबळ वापरून, IGR यांच्या थेट देखरेखीखाली या सर्व नोंदी पूर्ण केल्या जातील. ५० ते ३०० चौरस फुटांच्या छोट्या घरांत राहणाऱ्या गोरगरिबांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी आमदार तांबे यांनी पहिल्या दिवसापासून घेतलेली भूमिका निर्णायक ठरली आहे.
मालदाड रोड परिसरातील आरक्षण सुटण्याची आशा