नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |      संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग     |     
पालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये ? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात By Admin 2025-05-16

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




पालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये ? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

मुंबई  : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये पूर्ण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. प्रभाग रचना, आरक्षण व मतदार याद्यांचे काम पूर्ण केल्यावर मगच पावसाचा अंदाज घेऊन निवडणुका कधी घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाणार आहे.

बहुधा निवडणुका पावसाळ्यानंतरच घेतल्या जातील, असे संकेत आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व म्हणजे २९ महापालिका आणि ३२ जिल्हा परिषदांसह ६८७ स्थानिक स्वराज्य संस्था तसेच दीड हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सुरू केली. या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारकडे असल्याने लवकरात लवकर प्रभाग रचना करण्याचे आदेश सरकारला दिल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन ते पाच वर्षांपासून प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचा सर्व कारभार सध्या प्रशासकांकडे आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (६ मे) रोजी राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकारला दिले होते. या निवडणुकांची घोषणा चार आठवड्यांमध्ये करण्यात यावी, बांठिया आयोगाचा अहवाल बाजूला ठेवून २०२२ च्या पूर्वी इतर मागास प्रवर्गास (ओबीसी) जेवढे राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देण्यात येत होते, ते आरक्षण कायम ठेवून निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले होते.

आयोगाने नगरविकास आणि ग्रामविकास विभागास पत्र पाठवून किमान दोन-अडीच महिन्यांत प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रभाग रचनेस सुमारे दोन-अडीच महिन्यांचा, आरक्षणासाठी १५-२० दिवस तर प्रभागनिहाय मतदार याद्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यास सुमारे महिनाभराचा कालावधी लागणार आहे.

पावसाचा अंदाज घेऊनच निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांमध्ये म्हणजे सप्टेंबरपर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. त्याच वेळी निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा येण्याची मुभाही निवडणूक आयोगाला दिली आहे. निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने चार टप्प्यांमध्ये नियोजन केले आहे. आधी प्रभागांची रचना केली जाईल. त्यानंतर प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल. मतदार याद्या निश्चित केल्या जातील. हे तीन टप्पे पार पडल्यावर प्रत्यक्ष निवडणुका कधी घ्यायच्या याचा निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणुका या दोन -तीन टप्प्यांमध्ये घेण्याचे नियोजन आहे. सप्टेंबरमध्ये किती पाऊस पडू शकतो याचा अंदाज घेऊन मगच प्रत्यक्ष निवडणुका कधी घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाईल.

निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था :

महानगरपालिका- मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह सर्व २९

नगरपरिषदा- मुदत संपलेल्या व नवनिर्मित अशा सर्व २४८

नगरपंचायती- मुदत संपलेल्या व नवनिर्मित अशा- ४२ जिल्हा परिषदा- ३२ पंचायत समित्या- ३३६ ग्रामपंचायती- सुमारे दीड हजार