दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचार सभांना नागरिकांची मोठी गर्दी
संगमनेर ( प्रतिनिधी ) लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात सर्व विकासकामे मार्गी लागली आहे. शांतता सुव्यवस्था आहे मात्र काही लोक भेदभाव निर्माण करून आपल्यामध्ये फूट पाडतील. संगमनेर शहर व तालुका हा एकतेचा परिवार असून शहरातील शांतता व एकता जपण्यासाठी नागरिकांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये सेवा समितीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन हज यात्रा कमिटीचे अध्यक्ष भाईजान यांनी केले आहे.
सय्यद बाबा चौक येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बहुजन वंचित आघाडीचे अजीज ओरा,उमेदवार किशोर टोकसे,प्रियंका शहा, डॉ. दानिश, सरोजना पगडाल, लाला पठाण, नसीब बानो पठाण, अमजद खान पठाण, शकीला बेग, नूर मोहम्मद शेख,शकील पेंटर, बिंडू भाऊ जहागीरदार यांसह विविध उमेदवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाईजान म्हणाले की, माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात विकासाची खूप कामे झाली आहे. निळवंडे धरण पूर्ण करून 38 किलोमीटरची पाईपलाईन टाकून त्यांनी सर्व शहरवासीयांना स्वच्छ व मुबलक पाणी दिले आहे. तालुका व शहर परिवार मानले. कधीही भेदभाव केला नाही. सर्व समाजाच्या नागरिकांना विकासाची समान संधी दिली. या शहरांमध्ये सर्व समाजाचे नागरिक आनंदाने एकत्र राहत आहेत. विकासाची वाटचाल कायम ठेवायची आहे.
काही लोक येतील मतभेद करतील अशा लोकांना थारा देऊ नका. भाजप आणि शिवसेना हे मानवतेचा खोटा बुरखा घेऊन फिरत आहे. समाजामध्ये फूट निर्माण करत आहेत. अशा जातीयवादी शक्तींना वेळीच रोखा. याचबरोबर संगमनेरची एकता शांतता व आपले गाव आणि परिवारासाठी सर्वांनी सेवा समितीच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा असे आवाहन त्यांनी केले.
तर लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, काही लोक हे मते खाण्यासाठी उभे केली गेली आहेत. मत विभाजन करून सर्वांना सांभाळून घेणाऱ्या सेवा समितीच्या उमेदवारांना अडचणीत आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अशा फुटीरवादी लोकांना वेळीच ओळखा. त्यांना एकही मत पडणार नाही याची काळजी घ्या. संगमनेर शहराच्या शांतता सुव्यवस्था व वैभव जपण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून सेवा समितीच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन त्यांनी केले.