दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर सेवा समितीकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉ.मैथिली तांबे तर इतर 30 उमेदवार जाहीर
संगमनेर ( प्रतिनिधी ) लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने विकासाच्या योजना राबवल्यामुळे संगमनेर हे राज्यातील प्रगतशील व वैभवशाली शहर म्हणून ओळखले जात आहे. मात्र मागील काही दिवसांपासून शहरावर होणारे बाहेरचे आक्रमण रोखण्यासाठी शहरातील स्वाभिमानी नागरिकांनी राजकीय विचार बाजूला ठेवून संगमनेर सेवा समिती स्थापन केली आहे. यामध्ये महाविकास आघाडीसह सर्व समविचारी पक्ष असून या मार्फत जनतेचा जाहीरनामा प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व उमेदवार कटिबद्ध असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.
सुदर्शन निवासस्थानी आमदार सत्यजीत तांबे यांनी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, महाराष्ट्राचे नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरांमध्ये 1991 पासून सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या गेल्या. सर्व नगराध्यक्षांनी आपापल्या कार्य काळामध्ये अत्यंत चांगले काम केले. निळवंडे धरण थेट पाईपलाईन योजनेमुळे 24 तास स्वच्छ व मुबलक पाणी, 35 गार्डन, शैक्षणिक हब, वैभवशाली इमारती, विश्वासाची बाजारपेठ, शांतता सुरक्षितता सुव्यवस्था आणि सर्वधर्मसमभावाचे वातावरण यामुळे संगमनेर शहर हे राज्याला दिशादर्शक ठरले. सौ.दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने स्वच्छतेवर मोठे काम झाले असून मागील दहा वर्षांमध्ये राज्य व केंद्र सरकारकडून 27 कोटींची बक्षिसे मिळाले.
मागील चार वर्षापासून शहरात प्रशासन राज असून विकासाच्या गोष्टी लाल फिती मध्ये अडकल्या. अनेक विकासाची कामे रखडली बाहेरची आक्रमण सुरू झाले शहरात अस्वस्थता वाढली. अमली पदार्थांची तस्करी वाढली. हे सर्व बाहेरचे आक्रमण रोखण्यासाठी संगमनेर शहरातील सर्व नागरिकांनी तसेच महाविकास आघाडी व सर्व समविचारी पक्षांनी राजकारण विरहित एकत्र येत लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समिती स्थापन केली. जनतेचा जाहीरनामा घेऊन पुढील पाच वर्षात करावयाचे कामे अत्यंत प्रभावीपणे राबवणार आहोत याकरता अत्यंत कार्यक्षम काम करणारे उमेदवार दिले असून नवा विचार जो संगमनेरकरांना हवा ही संकल्पना राबवणार आहोत.
शहराच्या विकासासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी आणला मात्र मागील एक वर्षांमध्ये घोषणा झाल्या एक रुपयाचा निधी आला नाही किंवा ज्या मार्फत निधी आला त्या खात्याकडे एक रुपयाचा निधी शिल्लक नाही ही वस्तुस्थिती आहे.
अनेक सक्षम उमेदवार उमेदवारीची मागणी करत होते परंतु संख्या खूप असल्याने अनेक अडचणी झाल्या तरीही अनेक जण संगमनेरकर म्हणून शहराच्या विकासासाठी माघार घेतील अशी अपेक्षा व्यक्त करताना नागरिकांचा जाहीरनामा घेऊन आपण काम करणार असल्याचे ते म्हणाले. याकरता 11 जुने नगरसेवक असून 19 नव्या उमेदवारांना संधी दिली असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.