दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले
20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
प्रतिनिधी दिनांक 3
अवैध वाळू वाहतूक व तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहिती घेत असताना हंगेवाडी ते बेलवडी या रस्त्यावर कारवाई करून पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा ढंपर पकडला असून एक जण ढंपर वाळू सह पसार झाला आहे.तपास पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश लोंढे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, मनोज लातुरकर व उमाकांत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.पथक बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदयाची माहिती काढत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, सत्यम पारस पवार, (रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर व रोहित सुनिल धावडे, रा. शिरूर, जि. पुणे) हे ढंपरमधुन हंगेवाडी ते बेलवंडी जाणारे रोडने वाळुची चोरून वाहतुक करत आहेत. मिळालेल्या माहितीवरून पथक पिसोरा गावचे शिवारात हंगेवाडी ते बेलवंडी जाणारे रोडवर सापळा लावून थांबले असताना दोन ढंपर येत असल्याने पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा केला असता एक ढंपर चालकाने ढंपर न थांबविता निघुन गेला. त्यामागील ढंपर रोडचे कडेला थांबवून पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये मागील हौदामध्ये वाळू मिळून आल्याने त्यावरील वाहन चालक सत्यम पारस पवार, (वय 23, रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीकडे निघुन गेलेल्या ढम्परबाबत विचारपूस केली असता सदरचे ढंपर हे सुनिल भिमराव धावडे, रा. चिंचणी, ता. शिरूर, जि. पुणे (फरार) यांचे मालकीचे आहे. सदरचे ढम्पर रोहीत सुनिल धावडे, रा.चिंचणी, ता. शिरूर, जि. पुणे (फरार) हा चालवित असून त्यामध्ये तो वाळूची वाहतुक करत असल्याची माहिती सांगीतली. ताब्यातील आरोपीकडून 20,00,000/- रू किंमत त्यात विनाक्रमांकाचा महिंद्रा कंपनीचा ढम्पर व 50,000/- रू किंमतीची वाळु असा एकुण 20,50,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पथकाने वर नमूद आरोपीविरूध्द बेलवंडी पोलीस स्टेशन गुरनं 148/2025 बीएनएस 2023 चे कलम 303 (2), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून गुन्हयाचा पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.