दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
विविध प्रभागांमधून नागरिकांशी संवाद, नम्रता आणि आपुलकीने सर्वांना जिंकले
संगमनेर ( प्रतिनिधी ) उच्चशिक्षित डॉक्टर असून साधी राहणी, नम्रपणा, सर्वांना समजून घेण्याची पद्धत आणि सर्वांशी सुसंवाद यामुळे संगमनेर शहरातील नागरिकांशी अगदी आपलेपणाचे ठरलेल्या सेवा समितीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.मैथिलीताई तांबे यांनी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत आपण सदैव संगमनेर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहून शहरातील नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवू असा विश्वास शहरवासीयांना दिला आहे.
संगमनेर शहरातील मेन रोड,बाजारपेठ,गणेश नगर,नवीन नगर रोड,विविध प्रभागांमधून प्रचार फेरी मधून त्यांनी जेष्ठ महिला नागरिक विविध समाज घटक युवक यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांच्यासह शहरातील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ.मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, मा.नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांनी शहर परिवाराप्रमाणे जपले. स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर,हरित संगमनेर ही संकल्पना त्यांनी अत्यंत प्रभावीपणे राबवली. शहरामध्ये 35 गार्डन निर्माण केले याचबरोबर स्वच्छतेमुळे संगमनेर शहराला राज्य व राष्ट्रीय पातळीवर 27 कोटींची बक्षिसे मिळून दिली. शहरातील प्रत्येक कुटुंबामध्ये त्यांचा अगदी जिव्हाळ्याचा संबंध आहे.तीच परंपरा आपण पुढे चालवणार आहोत.
लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीमध्ये राजकारण विरहित सर्व नागरिक एकत्र आले आहेत. या सर्वांच्या सूचनाचे आदर करून संगमनेर 2.0 मांडण्यात आले आहे. पुढील एक वर्षात करावयाच्या कामांचे नियोजन करण्यात आले असून ट्राफिक व धूळ मुक्त संगमनेर यासाठी आपले पहिले प्राधान्य असणार आहे.
याचबरोबर संगमनेर शहर अस्वस्थ आणि असुरक्षित झाले असून महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य हे माझे ध्येय आहे याच बरोबर अनाधिकृत फ्लेक्स, रस्त्यावर होणाऱ्या सभा, व्यापाऱ्यांना होणारा त्रास यापासून शहरवासीयांना मुक्ती देण्यासाठी पहिले प्राधान्य असेल. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हे अत्यंत वैभवशाली शहर ठरले असून या शहराची परंपरा आपल्या सर्वांना जपायची आहे. सर्व समाजाचे लोक आनंदाने आणि गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहे हे वैशिष्ट्य आपल्याला पुढे न्यायचे आहे.