दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर मध्ये दहशत व गुंडगिरी खपवून घेणार नाही
संगमनेर (प्रतिनिधी) - लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे एक परिवाराप्रमाणे आहे. येथे सर्व समाजाचे लोक आनंदाने राहतात की परंपरा आपल्याला जपायची आहे. तरुणांना चुकीच्या मार्गाला लावून गुंडगिरी व दडपशाही करणारी प्रवृत्ती संगमनेर मध्ये खपवून घेणार नाही. असा इशारा देत संगमनेर शहराचा परिपूर्ण आराखडा राबवणार असून विकास कामांसाठी निधी आणण्यात आमची पीएचडी असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.
चैतन्य नगर, मालदाड रोड, मेन रोड, घोडेकर मळा येथे झालेल्या बैठकांमध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकनेते बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ. सुधीर तांबे उत्कर्षाताई रुपवते, उमेदवार शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर, प्रसाद पवार, नितीन अभंग, मालती डाके, दिपाली पांचारिया ,किशोर टोकसे, गजेंद्र अभंग ,गणेश गुंजाळ, श्रीमती विजया गुंजाळ, डॉ.दानिश यांच्यासह विविध उमेदवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, संगमनेर शहराची विकासातून मोठी वाटचाल झाली आहे. मोठमोठ्या विकासाच्या योजना मार्गी लागल्या आहेत. स्वच्छ पिण्याच्या पाण्याबरोबर पस्तीस गार्डन निर्माण केली आहे. मात्र मागील चार वर्षापासून नगरपालिकेमध्ये प्रशासक राज असून प्रशासक ही सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने काम करते. विकास कामे रखडली आहेत. आम्हाला सभेच्या परवानगी मिळू नये म्हणून प्रशासन दबावाखाली परवानगी देत नाहीत.
मागील काळात संगमनेर बस स्थानकासह शहरांमध्ये अवैधचा सुळसुळाट झाला. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मित्रमंडळाने कमान लावली त्यावर काही प्रवृत्तीने डबल कमान लावली यामधून त्याची प्रवृत्ती दिसून येते. शहरांमध्ये अवैध धंदे वाढले आहेत दादागिरी वाढली आहेत. हप्तेखोरी वाढली आहे. हे आता खपून घेणार नाही. कारण हे शहर आणि गाव आपल्या सगळ्यांचे अस्मिता आहे हे आपल्या सगळ्यांना जपायचे आहे. संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून शहराच्या परिपूर्ण विकासाचा आराखडा तयार केला असून या आराखड्यासाठी निधी कुठेही कमी पडणार नाही लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा सर्व मंत्री आदर करतात त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण निधी मिळू आणि विकास कामांसाठी निधी मिळवण्यासाठी करावयाचा पाठपुरावा आणि निधी मिळवण्यात आमची पीएचडी झाली असल्याचे ते म्हणाले.
तर लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, सेवा समितीमध्ये अनेक उमेदवार इच्छुक होते मात्र काहींना माघार घ्यावी लागली. शहराच्या विकासासाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी आता सर्वांनी एक राहायचे आहे. मागील एक वर्षांमध्ये शहरांमध्ये अनेक गोष्टी चुकीच्या सुरू झाले आहेत, त्या दुरुस्त करायचे आहेत. पुन्हा संगमनेर शहराला गत वैभव प्राप्त करून देण्याबरोबर संगमनेर शहर व तालुका राज्यात अग्रगण्य बनवण्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून काम करायचे असल्याने ते म्हणाले.