दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
निवडणूक काळात खोटी माहिती पसरवण्याचा आरोप - कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी
संगमनेर (प्रतिनिधी) : म्हाळुंगी पुलाचे काम आ.सत्यजीत तांबे यांच्यामुळे रखडले असे खोटे व बदनामीकारक विधान शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी 15 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्धी माध्यमांमधून केले होते .याबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी 15 नोव्हेंबर 2025 रोजी च अब्रू नुकसानीचा दावा केला होता. मात्र पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप पर्यंत कुठलेही उत्तर न आल्याने या पुलाबाबत जाणूनबुजून खोटी व दिशाभूल करणारी बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख विनोद मनोहर सूर्यवंशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
आमदार सत्यजीत तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 15 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक वृत्तपत्रांतून "काँग्रेस समर्थित पदवीधर आमदाराने म्हाळुंगी पुलाचे काम रखडवले" असा पूर्णपणे खोटा आणि तथ्यहीन आरोप सूर्यवंशी यांनी प्रसिद्ध केला. हा आरोप अत्यंत खोटा आणि बदनामीकारक असल्याने आमदार सत्यजीत तांबे यांनी 15 नोव्हेंबर 2025 रोजी विनोद मनोहर सूर्यवंशी यांच्या विरोधात अब्रू निशाणीचा दावा दाखल केला होता. मात्र आता पंधरा दिवस होऊ नये कोणतेही उत्तर न आल्याने आता शहर प्रमुख यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
याबाबत आमदार सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केले की म्हाळुंगी पुलासाठी लागणारा संपूर्ण निधी तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केला होता, आणि आरोपी किंवा त्याच्या पक्षाचा या निधीशी कसलाही संबंध नाही.
ते पुढे म्हणतात, “मी अपक्ष आमदार असून भारतीय जनता पक्ष, काँग्रेस किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्यत्व घेतलेले नाही. तरीदेखील आरोपी आणि त्याच्या पक्षातील काही नेते जनतेची दिशाभूल करण्यासाठी परस्परविरोधी व भ्रामक विधाने करीत आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे माझ्या सामाजिक प्रतिष्ठेला व विश्वासार्हतेला गंभीर धक्का बसला आहे. अनेक नागरिकांकडून मला या संदर्भात विचारणा होत आहे. आरोपीने जाणीवपूर्वक खोटी माहिती प्रसारित करून माझी सार्वजनिक प्रतिमा धोक्यात आणली आहे.”
तांबे यांनी 15 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपीला कायदेशीर नोटीस पाठवली होती. तथापि, सदर आरोपीने कोणतीही माफी मागितली नाही किंवा खोटा आरोप मागे घेतला नाही. त्यामुळे हे कृत्य सरळ सरळ कायद्याचे जाणूनबुजून केलेले उल्लंघन असल्याचे तांबे यांनी नमूद केले आहे.