दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
सेवा समितीच्या वतीने 20 नवीन तर 11 अनुभवी कार्यकर्त्यांना संधी
संगमनेर (प्रतिनिधी)--लोकनेते बाळासाहेब थोरात हे राज्याचे नेते आहेत त्यांचे सर्व पक्षात अत्यंत चांगले संबंध आहे मंत्रालयात कोणत्याही मंत्र्याकडे काम घेऊन गेले तर पहिले थोरात साहेबांचे ते विचारतात त्यांचा सर्वजण आदर करतात. त्यांनी कायम संगमनेर शहरासाठी निधी आणून हे शहर घडवले नावा रूपास आणले हीच परंपरा आपण कायम ठेवणार असून शहराच्या विकास कामांकरता कोणताही निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर शहरवासीयांना दिला आहे.
मालदाड रोड,अलकानगर, गणेश नगर मोमीनपुरा येथे झालेल्या संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभांमध्ये ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात खासदार भाऊसाहेब वाकचौरे उमेदवार नूर मोहम्मद शेख ,बेग इलियास सेवा समितीचे सर्व उमेदवार तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर सेवा समिती ही राजकारण विरहित असून या समितीच्या वतीने 20 नवीन व 11 जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पंचायत समिती जवळ साडेसात कोटी मधून ट्रक टर्मिनल उभारले असून आगामी काळामध्ये शहरातील सर्व ट्रक पार्किंग त्या ठिकाणी करण्यात येईल याचबरोबर ट्रॅफिक कमी करण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापन करावा लागणार आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे पाईपलाईन द्वारे शहरवासीयांना स्वच्छ व मुबलक पाणी दिले. संगमनेर शहरात सर्व आधुनिक सुविधा दिल्या शिक्षणाच्या निमित्ताने राज्यभरातून हजारो विद्यार्थी संगमनेर मध्ये येत आहेत मोठ्या विश्वासाने पालक संगमनेर मध्ये या सर्वांना पाठवत आहे मात्र मागील एक वर्षापासून संगमनेरची परिस्थिती बदलली असून अवैधंदे वाढले आहेत. अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. गुंडागर्दी वाढली आहे. मागील आठवड्यामध्ये एका मुलाचा हात तोडला जातो. पोलीस स्टेशन मध्ये मारामाऱ्या होतात हे सर्व काय सुरू आहे.यामुळे संगमनेरची प्रतिमा खराब होत असून हे सर्व थांबवण्याची जबाबदारी यापुढे आपले सर्वांचे आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे सर्व पक्षांमध्ये आदर करणारे कार्यकर्ते आहेत.मी कोणत्याही मंत्र्याकडे गेलो तर ते कधीही शब्द पडू देत नाही. शहराच्या विकासासाठी यापुढे सुद्धा कोणताही निधी कमी पडणार नाही याचबरोबर शहरातील गरीब लोकांना 500 स्क्वेअर फुट पक्के घरे देण्याचा मानस असून निधी आणण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार पाठपुरावा करावा लागतो संबंध चांगले असावे लागतात असे ते म्हणाले
तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की संगमनेर शहराची अत्यंत चांगली वाटचाल राहिली आहे. बंधू भावाचे वातावरण राहिले आहे. विकासासाठी सातत्याने विकासाच्या योजना आपण राबवले आहे. कधीही भेदभाव केला नाही. मात्र मागील एक वर्षापासून शहरांमध्ये व तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. शांतता व व्यवस्था बिघडली आहे. अवैध धंदे वाढले आहे. ड्रग इतर अमली पदार्थ संगमनेर शहरात येतात कसे कोण आहे या पाठीमागे याचा विचार जनतेने करावा. या पाठीमागे असे कधीही झाले नाही आता संगमनेर मध्ये हे सर्व होत आहे. हे सर्व रोखण्याची जबाबदारी आपली आहे. राजकारणाचे मतभेद विसरून शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र या असे आवाहन त्यांनी केले.